Friday 3 February 2017

अफझलखानाची कबर...

अफझलखानाची कबर... ही तर शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतिक ! 

ती पाहण्यासाठी खुली झालीच पाहिजे ...

🖋चंद्रकांत पाटील - (9930360506)


Image result for afzal khan shivaji


छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढताना खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने महाराजांवर वार केला. हा सुद्धा इतिहास आहे. इतकच काय वाईमध्ये शिवरायांचा पाडावा व्हावा म्हणून अनुष्ठान घातल्याचाही इतिहास आहे. पण अनेकदा खोटा, अर्धवट किंवा सोयीचा इतिहास सांगून गैरसोयीचा इतिहास झाकला जातो. त्यामुळे अनेदा काही अर्धवटराव ऐकिव माहितीलाच इतिहास मानायला लागतात. आणि मग त्यातूनच इतिहासाची मोडतोड सुरू होते. ती धार्मिक किंवा जातीय तेढ, दंगली आणि राजकारणावर येवून थांबते. याला अफझल खानाची कबर सुद्धा अपवाद नाही. खानाच्या कबरीचे उदात्तीकरण करण्याचा कोणाचा डाव होता का ? तर होताच असे म्हणता येईल. पण त्याला विरोध करण्याच्या नांवाखाली कबर उद्धस्त करण्याचा डाव सुद्धा आखला होता. हे पण समाजाला समजले पाहिजे.
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अर्थात १० नोव्हेंबर १६५९ हा दिवस अफझल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी मुक्रर केला. अंगरख्याखाली चिलखत, पागोट्याखाली शिरस्त्राण आणि हातात वाघनखे घालून प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढला. दगाबाज खानासह त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा आणि वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचाही खातमा केला. पण शत्रूच्या मृत्यूनंतर वैर संपते असे मानणाऱ्या महाराजांनी अफझल खानासह सय्यद बंडा या शत्रूंचा दफनविधी करून त्यांच्या कबरीसुद्धा बांधल्या. इतकच नाही तर कबरींच्या देखभालीसाठी तरतूदही करून ठेवली. त्या कबरी आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे महत्वाचे प्रसंग घडले त्यातला सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे अफझलखानाचा शेवट. जर कोणी पराक्रमाचा पुरावा विचारला तर या कबरीच पराक्रमाच्या प्रतिक आहेत. पण हाच पराक्रम उद्धवस्त करण्याचा कोणाचा डाव तर नाही ना ? अशी शंका आजही येते. कारण या कबरीचा आकारच महाराजांच्या भव्य पराक्रमाची साक्ष देतो. 

 सन १८८३...तत्कालिन ब्रिटीश अधिकारी ग्रँड डफ याने महाबळेश्वर परिसरात फिरतानां प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफझल खानाच्या कबरीची दखल घेतली, त्याला या कबरींचे महत्व लक्षात आले. त्याने १९०५ साली छत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतिक बनलेल्या या कबरींचे संवर्धन करण्याची अधिसूचना काढली. या कबरीची नासधूस करणाऱ्यास पाच हजार रूपये दंड आणि तीन महिन्याची शिक्षा करणारा कायदाच केला. पुढे १९१८ साली तत्कालीन कलेक्टर बी ए ब्रॅडन यांनी वनखात्याच्या मालकीची २७ गुंठे जमीन “अफझल खान टोंब” या नांवाने वर्ग केली. पण ती जमीन नेमकी कोणाला केली याची नोंद आढळत नाही. ब्रिटीश सरकारने पुढे २३ नोव्हेंबर १९२३ रोजी “अफझल तुर्बत फंड ” स्थापन केला. त्यामार्फत कबरीची देखभाल होऊ लागली. त्यामध्ये महालकरी (तहसिलदार) आणि पोलिस अधिकाऱ्यांसह चार-पाच ट्रस्टींची नेमणूक करण्यात आली. 
 १९५२ साली “अफझल तुर्बत ट्रस्ट” स्थापन करण्यात आला. तो पुढे १९५९ ला रद्दही करण्यात आला. या ट्रस्टमधला एक ट्रस्टी गुलाम जैतुल आबेदिन इमामत हा पाकिस्तानात गेला. पण या घडामोडी सुरू असतानाच २०  ऑक्टोबर १९६२ साली “ हजरत मोहमद अफझल खान मेमोरियल सोसायटी” या नवीन संस्थेला मुंबईच्या धर्मदाय आयुक्तानी परवानगी दिली. ७३, मेमनवाडा, मुंबई या पत्यावर नोंदणी झालेल्या संस्थेत महमद हुसेन हे सेक्रेटरी तर इम्तियाज कादर, सलिम पटेल, सलिम भाई, आणि युसुफ पटेल हे ट्रस्टी म्हणून कार्यरत होते. या संस्थेने कबरीभोवती अनेक बांधकामे सुरू केली. या ठिकाणी गँगस्टर हाजी मस्तान यानेसुद्धा इथल्या बांधकामानां देणगी दिल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे त्या त्या सरकारच्या काळात जमीनी आणि बांधकामानां परवानग्या मिळत गेल्या. पण पुढे खऱ्या अर्थाने वादाला सुरूवात झाली ती बाबरी मशिद पाडल्यानंतर. कबरीच्या भोवती झालेल्या बांधकामाना हिंदुत्ववादी संघटनानी आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. कबरीचे उदात्तीकऱण रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनाची आंदोलने सुरू झाली. त्यातूनच २००४ साली सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं मोठी दंगल झाली होती. त्यावेळेच्या विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड सुरू होती. हिंदूत्ववादी संघटनानी विजयोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर प्रचंड मोठी दंगल आणिँ लाठीचार्ज झाला होता. हा अगाऊपणा कऱणाऱ्या नेत्यानां पोलिसानी चांगलेच सोलटून काढले होते. त्यानंतर या आंदोलनाने आजअखेर  पुन्हा डोके वर काढले नाही. 

 तत्कालिन प्रशासनाने अफझल खानाच्या कबरीच्या वादाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींची एकदा सहलही घडवून आणली होती. त्यानंतर माध्यमांतून वस्तूस्थिती सांगणाऱ्या बातम्या येवू लागल्या. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटनांची गोची झाली होती. पण पाचवडच्या दंगलीवेळी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी पत्रकारांवर वचपा काढायचा प्रयत्नही केला होता. 
  खर तर संबधित ट्रस्टीने या कबरीचे उदात्तीकरण केल यात शंका नाही. संस्थेची स्थापना करतानाच ट्रस्टीनी चालूपणा केला होता. हजरत म्हणजे ‘संत’ आणि ‘मोहमद’ म्हणजे इस्लामचे अंतिम प्रेषित...या दोन शब्दांचा खोडसाळपणे आणि जाणिवपूर्वक वापर केला. जेणेकरून त्याला धार्मिक भावनां जोडल्या जातील, मुळात १०० वर्षापूर्वीची कागदपत्रे तपासली की कांहि हिंदू धर्मीय लोक मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस बोलतात तसा या कबरीला कागदी पाळणा वाहण्याची प्रथा होती. तसेच खानाचा उरूस साजरा केला जायचा. त्यामुळे इतिहासापेक्षा वर्तमान वेगळाच होता. याचाच फायदा उठवत कबरीचे उदातीकरण सुरू झाले होते. त्यामध्ये वन विभागा इतकाच पुरातत्व विभागसुद्धा याला दोषी आहे. खरा इतिहास काय आहे हे ज्यांनी सांगायचे ते या वादापासून पळ काढत आहेत.  द ब पारसनीस यांनी १९१६ मध्ये लिहलेल्या महाबळेश्वर या इंग्रजी पुस्तकात कबरींवर कौलारू छप्पर असल्याचे छायाचित्र आहे. इतिहासतल्या नोंदी आणि संशोधनांची सांगड घालून कबरीं संदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. पण त्शायाबाबत कोणी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यासंबधी सरकारने एकदा माहिती मागविली होती. पण पुरातत्व खात्याने स्पष्टपणे अहवाल न देता चालढकल केली आहे. 

दरम्यान  हिंदुत्ववादी संघटनांनी या कबरीच्या उदात्तीकरणाबरोबर या परिसरात अतिरेक्यानां प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप सुरू केला होता. त्याबरोबर कबर उद्धस्त करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सातारा पोलिस प्रशासनाला २४ तास बंदोबस्त नेमावा लागला. गेल्या अनेक वर्षापासून ८-१० पोलिस या कबरीच्या संरक्षणासाठी तैनात असतात. आजही ऊन, वारा आणि पावसात पोलिसांना जागता पहारा करावा लागत आहे. राज्यातला उच्चांकी पाऊस आणि अंग गोठवणारी बोचरी थंडी यामध्ये पोलिसांचे आतोनात हाल होत आहेत. पण त्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही. कबर उद्धवस्त करण्याच्या धमक्या देणाऱ्यानीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून समजून घेतला पाहिजे. कबरीचे उदात्तीकरण रोखलेत पाहिजे. त्यासाठी कबरच उद्ध्वस्त करण्याचा इशाराही गैरच आहे. विशेषतः 2004 पासून कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला. 


  या कबरीच्या परिसरात अनेक इमारती अतिक्रमण करून बांधण्यात आल्या. त्यामुळे वन जमीनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली बांधकामे हटविण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. पण वन विभागाने कोणताही कारवाई केली नव्हती. त्याविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली होती. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही अतिक्रमणे तत्काळ न हटविण्यात आल्यास तेथील वन अधिकाऱ्यांना वनात पाठवू, असा इशारा दिला आहे. आता या इशाऱ्यामुळे वन विभागाला आता कारवाई करावीच लागेल, आणि ती गरजेचीसुद्धा आहे. कारण या अतिक्रमणांच्या विळख्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही झाकला जातोय. गेल्या १५-१६ वर्षापासून या परिसराला १४४ कलम लागू केल्यामुळे कबरीच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. त्यामुळे नव्या पिढिला हा इतिहास सांगायचा तरी कसा असा प्रश्न आहे. 
सरकारने ही सर्व मालमत्ता ताब्यात घेतली पाहिजे. तसेच अतिरिक्त बांधकामे पाडून अफझलखानाची कबर पाहण्यासाठी खुली केली पाहिजे. त्याठिकाणी सरकारने अधिकृत इतिहास सांगणारे एक दालन उभे केले पाहिजे. केवळ हिंदूत्ववाद्यांच्या धमक्यामुळे कबर झाकून ठेवली तर इतिहास कधीच माफ करणार नाही. सव्वाशे वर्षांपूर्वी ग्रँड डफला शिवाजी महाराजांचा पराक्रम समजला म्हणूनच तो मराठ्यांचा इतिहास लिहू शकला. आपण किमान खरा इतिहास कधी लिहणार ??

Thursday 26 January 2017

पुन्हा घडू नये असं वाटतं, पण....






 बारा वर्षापूर्वी मी सातारा तरूण भारतसाठी पत्रकारिता करत होतो.  त्या कालावधीत म्हणजेच २५ जानेवारी २००५ रोजी नाशिकच्या फरशीवाल्या बाबाचा आशिर्वाद घेण्यासाठीची साताऱ्यात झुंबड उडाली होती. बाबाने डोक्यावर फरशीचा तुकडा ठेवला की आजार बरा होतो, अशी बाबाची ख्याती होती. याच बाबाची भोंदूगिरी चव्हाट्यावर आणण्यासाठी पत्रकारांचीही त्या गर्दीत जाण्यासाठीची धडपड चालली होती. त्या गर्दीत जीवन चव्हाण या पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. त्याच्या निषेधार्थ तत्कालिन जिल्हाधिकारी सुबराव पाटील यानां निवेदन देण्यासाठी सगळेच पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात थांबले होते. १५-२० मिनिटात सुबराव पाटील कार्यालयात दाखल झाले, पण त्यांनी निवेदन स्विकारण्याएेवजी मला बाजूला बोलावून घेवून कानांत एक धक्कादायक माहिती दिली. काही क्षण मी तर बधीरच झालो. ती माहिती मी सर्व पत्रकारानां दिली. त्यांनतर आम्ही पत्रकाराला झालेली धक्काबुक्की विसरूनच गेलो. सगळेच पळायला लागले. काही कळायच्या आत आम्ही आपापल्या कार्यालयात गेलो. अवघ्या तासाभरात मांढरगडावर पोहचलोसु्द्धा...
  तिथलं दृश्य भयानक होतं. तब्बल २९३ जणांचा बळी गेला होता. शेकडो जखमी झाले होते. मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त होती.  सगळीकडे आक्रोश ऐकायला येत होता. खरंतर मृतांची संख्या किती याचा अंदाज येत नव्हता. कोणी ५०० हून अधिक तर कोणी १००० पर्यंत मृतांची संख्या नेवून ठेवली होती. अचानक मला एका हिंदी चॅनलला आॅन लोककेशन रिपोर्ट देण्यासाठी दिल्लीहून फोन आला. आजूबाजूला सिलेंडरचे मोठमोठ्या आवाजात होणारे स्फोट सुरू होते. आणि त्यातच हा फोन... काही सुचत नव्हतं पण आयुष्यात पहिल्यांदा टिव्ही चॅनलसाठी फोन दिला, आणि तोही आॅन एअर झाला यात मोठेपणा वाटत होता. दिवंगत पत्रकार व्यंकटेश चपळगावकरने स्टार न्यूजला माझा नंबर दिला होता. आपलं कोल्हापूरी हिंदी आणि तिकडून अँकरच्या प्रश्नांचा भडीमार याच्यात माझी दमछाक होत होती. त्यावेळी मेलेल्यांच्या दुखःपेक्षा  फोनची हौस भारी... आठवडाभर आधी मांढरदेवी देवस्थानला दोनदा योवून गेलो होतो. त्यामुळे तिथल्या भाकड कथानां छेद देणारी "काळूबाईच्या नवसाची कथा,  पण झाडानां उगाच का व्यथा" ही स्टोरीही मी तरूण भारत मध्ये छापली होती. तिथं दुसऱ्यावर करणी करण्यासाठी मंदीर परिसरातील झाडाला खिळे ठोकण्याची अघोरी प्रथा आहे ती. ते सगळ सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो.  मी माझे सहकारी स्वरूप जानकर, दिपक प्रभावळकर, प्रवि्ण जाधव आणि फोटग्राफऱ संजय कारंडे यांच्यासह मांढरदेवला सर्वात आधी पोहचलो होतो. त्यामुळे तरूण भारतकडे सर्वात जास्त घटनास्थळाचे लाईव्ह फोटो होते. मंदीर परिसरात पोहचल्यानंतर जे दृश्य पाहिले ते आजही मनात कायम आहे. एक एक प्रसंग आठवला कि अंगावर शहारे येतात.

  ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तो मंदीर परिसर एका टेकडीवर आहे. यात्रा काळात मंदिराच्या कमानीतून प्रवेश करून दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग होता. यात्रा आठवडाभर चालत असली तरी अमावस्येच्या दिवशी सर्वात जास्त गर्दी असते. त्या दिवशी सुमारे पाच लाखाच्या आसपास हि गर्दी होती. संपूर्ण परिसर गर्दीने भरून गेलेला. जोरजोरात वाजणारा हालगी आणि ताशांचा गजर आणि त्या एका विशिष्ट तालावर अंगात काढून घुमणाऱ्या बायका... हे वेगळच दृश्य होतं. तिथच नवस फेडण्यासाठी आणलेल्या बकऱ्यांच्या कत्तली...रक्ताचे वाहणारे पाट... नारळाच्या शेंडीचा ढिग...आणि परतीच्या मार्गावर फोडलेल्या नारळाचे पाणी वहात असल्यामुळे झालेली घसरण...हीच २९३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. एकावर एक थर रचावेत अशी माणसं एकमेकांच्या अंगावर पडत गेली आणि प्रेतांचा खच पडत गेला. त्याचदरम्यान पांगलेली गर्दी आजूबाजूच्या दुकानात घूसली त्यामुळे पत्र्याची दुकाने कोलमडून पडली. त्याच दुकानांमध्ये शार्टसर्किट झाले आणि त्याचा अनेकानां शाॅक बसू लागला. त्यातही अनेकांचा जीव गमवावा लागला. त्याच्यापेक्षा भयानक म्हणजे मंदीर परिसरातील दुकानानां आगी लागल्या आणि लूटमार सुरू झाली. सगळ्या दुकानांतला माल तसाच जळून खाक झाला पण त्यावेळी अनेकांनी मोठी लूटमार केली. कांही दुकानांमध्ये सिलेंडरचे स्फोट होऊ लागले. संपूर्ण परिसरात पळापळ सुरू झाली. भेदरलेल्या अवस्थेतील रडणारी लहान मुलं आणि जखमी अवस्थेत तळमळणारी माणसं आजही आठवतात. अनेक प्रेतांच्या भोवती धायमोकलून ओरडणारी माणसं आठवली की अंगावार काटा येतो. त्यामध्ये गरीबांची संख्या मोठी होती. पत्रकारितेच्या भाषेतला सगळा बहुजन समाज होता.

  कसं झालं,... कुणी केल... काही कळायला मार्ग नव्हता. पण प्रत्येकजण यात संधी साधून घेत होता. काही बदमाश लोकानी प्रेतांच्या अंगावरचे दागिनेसुद्धा चोरले. तर काहीनी दुकानातला गल्ला लुटला...अशा भयानक वातावरणात काही दुकानदारानी प्रशासनाविरोधातला आपला राग काढायची संधी साधली. त्या जमावाने वाईचे तहसिलदार शिवाजीराव तळपे यांना पेटलेल्या नारळांच्या ढिकाऱ्यात फेकून देण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हाधिकारी सुबराव पाटील आणि तत्कालीन ॲडिशनल एसपी जय जाधव यांनी प्रसंगावधान राखून तळपे यांचा जीव वाचवला. हा प्रसंग सर्वात भयंकर होता. एसपी चंद्रकांत कुभार जमाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.  अशातच होणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटानी संपूर्ण परिसर हादरून जायचा. अंगाचा थरकाप उडायचा. सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत हे सत्र सुरूच होते. सुमारे चारच्या दरम्यान आम्हाला पण पत्रकारितेची आठवण झाली. मी माझ्या सहकाऱ्यानां एकत्र बोलावून घेतले. सर्वानी पाणी पिऊन घेतले. अत्यंत थंड डोक्याने कोणकोणत्या बातम्या करायच्या हे ठरवले. तोपर्यंत सर्व संपत आलेलं होतं. २९३ लोकांचा मंदिर परिसरात बळी गेला होता. बकऱ्यां-कोंबड्यांचा बळी देवून आपलं नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तांचाच इथं बळी गेला होता. जगभरातल्या माध्यमांचा आठवडाभर माढरदेवला मुक्काम होता. अशातच दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीला माढरदेवच्या मराठी शाळेतच आम्ही झेंडावंदनला उपस्थित राहिलो.

 मला अजून आठवतय या सगळ्या प्रसंगात तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कामगिरी कोणी विसरू नये. अशा प्रसंगी त्यांच्या कामाची दखल घेतलीच पाहिजे. त्यांनी वाईच्या सरकारी आणि खासगी रूग्णालयात जखमींवर उपचार आणि मृतदेहांची ओळख पटवून संबधित नातेवाईकांच्या ताब्यात देवून त्यांना त्यांच्या घरापर्यंत अँम्ब्युलन्सने पोहचवण्याची जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्याबरोबर सर्व पक्षांचे स्थानिक नेतेसुद्धा मदतकार्यात योगदान देत होते. आठवडाभरानंतर आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं तो भाग वेगळा...पुढे न्यायमूर्ती राजन कोचर यांची चौकशी समिती नेमण्यात आली. त्यांनी सरकारला अनेक चांगल्या शिफारशी केल्या आहेत. पण माहित नाही त्या शिफारशींच काय झालं.

दुर्घटनेनंतर काही काळ इथल्या अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सुबराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. पण आता माहित नाही काय परिस्थिती आहे. घटनेच्या दुसऱ्यावर्षीच मागचा कित्ता गिरवण्याचा प्रकारही त्यावर्षी झाला होता. या देवस्थानच्या ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश असतात. २९३ माणसांचा बळी गेला तरी तिथली नवस फेडण्यासाठी बळींची प्रथा सुरूच होती. त्या ठिकाणी बकरी आणि कोंबडं कापण्याचा ठेका देणाऱ्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. .त्यावेळी संबधित न्यायाधिशानां भानावर आणणारी बातमी आम्ही छापील होती. त्यामध्ये सरकारने देवाच्या नांवाने सार्वजनिक ठिकाणी होणारी पशूहत्या रोखण्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेले आश्वासन प्रसिद्ध केले. त्याची जाणीव संबधितानां करून दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनीही मला सविस्तर माहिती दिली होती. या बातमीनंतर मात्र ती निविदा रद्द झाली. पण एक जिल्हा न्यायाधीश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि त्याच मंदिराच्या परिसरात देवाच्या नांवाने पशूहत्या होते हा विरोधाभास होता. या न्यायाधिशांवर घटनेला जबाबदार म्हणून खटला पण भरला होता. पुढे त्या केसचं काय झालं माहित नाही. आपल्याकडे अशा शेकडो घटना घडल्या तरी लोकांची मानसिकता मात्र तशीच कायम आहे. फारशी सुधारणा होतानां दिसत नाही. एवढ्या लोकांचा बळी गेला तरी देवाची भक्ती काही कमी होत नाही. कदाचित आजही बकऱ्या-कोंबड्यांचा रस्सा आणि मटणात देवाचा/देवीचा संचार त्यांच्या भक्तानां जाणवत असेल.

  पण काही असो, १५-१६ वर्षापूर्वी मी देवानां नकार दिला, पण मटणाला नाही. आजही कोणी मटण खायला बोलावलं तर मी नकार देवू शकत नाही. यात्रेतलं मटण खाण्यासाठी मी पण ७०-८० किमीचा प्रवास केला आहे. कारण त्या मटणाची चव काही वेगळीच असते.
कदाचित देवाला माहित असेल मला काय आवडतं...!!

- चंद्रकांत पाटील
9930360506

Tuesday 10 January 2017

तो सध्या ब्लाॅग लिहतोय...
नादखुळा...